नवी दिल्ली : गोवंश तस्करीप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे नेते अनुब्रत मंडल यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे.

सीबीआयने गोवंश तस्करीप्रकरणी ही कारवाई केली आहे. अनुब्रत मंडल यांना सीबीआयने दोन दिवसांपूर्वीच समन्स पाठवले होते. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे नेते पार्थ चॅटर्जी यांना अटक झालेली असतानाच आणखी एका नेत्यावर कारवाई झाल्याने ममता बॅनर्जींना मोठा धक्का बसला आहे. अनुब्रत मंडल हे ममता बॅनर्जी यांचे जवळचे सहकारी आणि पक्षाचे बिरभूम जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत.

२०२० मध्ये गोवंश तस्करीप्रकरणी सीबीआयने त्यांना अटक केली आहे. २०१५-१७ दरम्यान सीमा सुरक्षा दलाने सीमेपार तस्करी होणाऱ्या २० हजार जनावारांना पकडले होते. याचप्रकरणी सीबीआयने काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काही ठिकाणांवर छापे टाकले होते. सीबीआयने अनुब्रत मंडल यांना चौकशीसाठी यापूर्वी दहा वेळा समन्स पाठवले होते; परंतु ते कुठल्याही चौकशीसाठी हजर राहू शकले नाहीत. त्यानंतर सीबीआयने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने सीबीआयला अटकेची परवानगी दिली होती.