कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील शिवाजी विद्यापीठाला नुकताच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने ‘कॅटेगरी-१’ विद्यापीठाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. ही माहिती कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत दिली.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले की, विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) विद्यापीठांना श्रेणीबद्ध स्वायत्तता देण्याचा निर्णय २०१८मध्ये घेतला. त्यानुसार ‘नॅक’ (बंगळूर) यांचे ३.५१ सीजीपीए गुणांकन आणि त्यावरील गुणांकनप्राप्त विद्यापीठांसाठी ‘कॅटेगरी-१’, ३.२६ ते ३.५० या दरम्यान गुणांकनप्राप्त विद्यापीठे ‘कॅटेगरी-२’ आणि त्याव्यतिरिक्त सर्व विद्यापीठे ‘कॅटेगरी-३’ अशी ही श्रेणीरचना करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाला नॅकच्या ३.५२ सीजीपीए गुणांकनासह ‘A++’ मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे युजीसीकडून विद्यापीठाला ‘कॅटेगरी-१’ दर्जा प्रदान करण्यात आला आहे. यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनेकविध सोयीसुविधा प्राप्त होण्यास विद्यापीठ पात्र ठरले आहे.

यामुळे विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राला युजीसीकडून सलग पाच वर्षांसाठी मान्यता मिळालेली आहे. यापूर्वी दरवर्षी ही प्रक्रिया करावी लागत असे. त्याचप्रमाणे विद्यापीठास स्वतःचे संचलित महाविद्यालय चालवावयाचे असल्यास त्यासही मान्यता मिळू शकते. शिवाजी विद्यापीठ आता ऑनलाईन अभ्यासक्रम राबविण्यासही पात्र ठरले आहे. त्यानुसार विद्यापीठ आता पुढे जात असून, आवश्यक कन्टेन्ट विकसित करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. नजीकच्या काळात याचे आणखीही लाभ शिवाजी विद्यापीठाला पर्यायाने विद्यार्थ्यांना होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.