कोल्हापूर (प्रतिनिधी) :  आंदोलनात भाषण करताना नेत्यांचा एकेरी शब्दात उल्लेख केल्याचा जाब विचारात एकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी गोकुळच्या संचालकांसह सहा जणांविरोधात गगनबावडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. यामध्ये गोकुळचे संचालक बयाजी शेळके, सहदेव कांबळे, शिवाजी राऊत, निलेश म्हाळुंगेकर, सूर्यकांत पडवळ, तुकाराम पाटील अशी त्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद गगनबावडा तालुक्यातील मणदूर येथील ज्ञानदेव बापू कांबळे (वय ४०) यांनी दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यातील आरोपींनी ज्ञानदेव कांबळे यांना गाडीमध्ये बसवून साळवण येथील अरविंद खाटीक यांच्या दुकानासमोर आणले. यावेळी दुकानात गोकुळचे संचालक बयाजी शेळके बसले होते. शेळके यांनी मोबाईलमध्ये कांबळे यांनी केलेल्या कोरोना लसीच्या सक्तीविरोधात काढलेल्या आंदोलनातील भाषणाचा व्हिडिओ दाखवला. यामध्ये कांबळे यांनी एका नेत्याचा एकेरी उल्लेख केला होता. तू आमच्या नेत्याचा एकेरी उल्लेख का केला ? असा जाब विचारत सहदेव कांबळे याने फिर्यादीच्या दोन्ही पायावर काठीने मारहाण केली.

त्यानंतर शेळके, पडवळ, पाटील, राऊत, म्हाळुंगेकर यांनी ज्ञानदेव कांबळे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच ‘तुला गावात राहू देणार नाही अशी धमकीही दिल्याची फिर्याद कांबळे यांनी दिली आहे. मात्र, गोकुळच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणी पुढील कारवाई होणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.