कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऊस तोडणी मजुरांसाठी कारखाना कार्यक्षेत्रावर कोरोना लसीकरण मोहीम राबवावी अथवा कॅम्प आयोजित करावा. तसेच मजुरांच्या १५ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरण तर मजुरांना आवश्यकतेनुसार बूस्टर डोस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी आ. अमल महाडिक यांनी आज (मंगळवार) केली.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कोव्हिड संबंधित नियमांचे पालन करणे व लसीकरण करण्यासाठी आवाहन केले जात आहे. परंतु ऊसतोडणी मजुरांना रोजगारासाठी आपल्या घरापासून, गावापासून शेकडो किलोमीटर अंतरावर सहकुटुंब स्थलांतरित व्हावं लागतं. यापैकी कित्येक लोकांकडे अँड्रॉइड फोन, टीव्ही व इतर माहिती प्रसारणाची साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे बरेचसे लोक आपल्या सुचनेपासून वंचित राहतात व पर्यायाने आजाराचे गांभीर्यही त्यांच्या लक्षात येत नाही.

आज जिल्ह्यातील शेतकरी बांधव कोरोना, महापूर, अतिवृष्टी अशा कारणांमुळे आर्थिक अडचणीत आहे. या परिस्थितीत त्यांचा ऊस कारखान्यात पोचण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रियेत ऊस तोडणी मजूर महत्वाची भूमिका पोचवतात. त्यामुळे एकाप्रकारे हे मजूरसुद्धा आम्हा शेतकरी व कारखान्यांच्या दृष्टीने फ्रंटलाईन वर्करच आहेत. त्यांची काळजी घेणं ही एकप्रकारे आपली जबाबदारी आहे. त्यामुळे ऊसतोडणी मजुरांसाठी कारखाना कार्यक्षेत्रावर लसीकरण मोहीम राबवावी, अशी मागणी महाडिक यांनी निवेदनात केली आहे.