आरेमध्ये कारशेडच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा : अमित ठाकरे

0
57

मुंबई (प्रतिनिधी) : मेट्रो कारशेड आरे जंगलातच करण्याचा शिंदे सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी धक्कादायक आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये म्हणून शेकडो तरुण-तरुणींनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकले होते. आपल्याला विकास हवाच आहे; पण पर्यावरणाचा बळी देऊन नको. त्यामुळे मेट्रो कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी आग्रहाची विनंती राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केली आहे.

विशेष म्हणजे आरे बाबतीत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोन ठाकरे बंधूंमध्ये एकमत असल्याचे पाहायला मिळत आहे. आपले पर्यावरण उद्ध्वस्त झाले, तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही, याचे भान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवे, असेही अमित ठाकरे यांनी म्हटले आहे.

माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आरे जंगलात मेट्रो कारशेड होऊ नये, यासाठी जीवाचे रान केले. तत्कालीन फडणवीस सरकारने आरेविषयी निर्णय घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ठामपणे विरोधाची भूमिका घेतली. पर्यावरणप्रेमी जनतेला सोबत घेऊन पर्यावरण वाचविण्याची हाक त्यांनी दिली. उद्धव ठाकरे यांनी देखील शुक्रवारी पत्रकार परिषदेत आरेमध्ये मेट्रो कारशेड होऊ नये, असा पुनरुच्चार केला होता. शुक्रवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फडणवीस यांचे पत्र लिहून कौतुक केले, तर आज (शनिवारी) अमित ठाकरे फडणवीस यांच्या आरेमध्ये मेट्रो कारशेड होण्याच्या निर्णयास विरोध केला आहे.