कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील कसबा बावडा ते वडणगे मार्गावरील पंचगंगा नदीच्या राजाराम बंधाऱ्यावरून कार थेट नदीच्या पाण्यात कोसळली. चालकाने प्रसंगावधान राखत गाडीतून उडी मारून, पोहत नदीचा काठ गाठल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी, कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यावरुन वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. आज (रविवार) दुपारी चार वाजता एक वाहनचालक बंधाऱ्यावरून जात होता. दरम्यान, चालकाचा अंदाज चुकल्याने ही कार थेट बंधाऱ्यावरून नदीत कोसळली. या घटनेने नदीकाठी असलेल्या नागरिकांनी आरडाओरडा केला. नदीच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर कार वाहू लागली. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत गाडीतून बाहेर येत पोहत नदीचा काठ गाठला.

या बंधाऱ्यावर अशा प्रकारच्या काही घटना यापूर्वी याच ठिकाणी घडल्या आहेत. त्यामुळे नदीवरील बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूनी कायमस्वरूपी बॅरिगेट्स लावण्याची गरज असल्याचे स्थानिक आणि वाहनचालकांनी मागणी केली आहे.