कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या संरक्षण तटबंदीवरून दोन अज्ञातांनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास गांजा १० मोबाईल, पेन ड्राईव्ह व मोबाईल कॉड असे साहित्य तीन पुड्यांतून कळंबा कारागृहामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास फेकले. ही बाब निदर्शनास येताच कारागृहातील पोलीस हवालदार रवींद्र वसंत भाट (वय ५१, मूळ रा. चांदेकरवाडी, ता. राधानगरी, सध्या रा. कळंबा जेल क्वार्टर्स) यांनी कारमधून आलेल्या दोघा अज्ञातांविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी गांजासह अन्य साहित्य जप्त केले आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सोमवारी मध्यरात्री सुमारास कळंबा कारागृहाच्या समोरील बाजूस दोन इसम कारमधून आले होते. त्यांनी तीन पुड्यांमधून आणलेला ७७५ ग्रॅम गांजा, १० मोबाईल हँडसेट, दोन पेनड्राईव्ह, ५ मोबाईल कॉड, पाच प्लास्टिकच्या पिशव्या, दोन रुमाल व एक कापडी पिशवी असा मुद्देमाल आढळून आला. गांजा, मोबाईल, पेनड्राईव्ह, मोबाईल कोड, प्लास्टिक व कापडी पिशव्या तसेच रुमाल असा सुमारे १५ हजार ७२५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी कळंबा कारागृहातील पोलीस हवालदार रवींद्र भाट यांनी याबाबतची फिर्याद जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये मंगळवारी रात्री उशिरा दाखल केली. त्यानुसार या वस्तू फेकणारे दोघे अज्ञात इसम या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून त्या आधारे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. कारागृहाचा सुरक्षा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.