कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षण कायदा अंमलात असताना राज्यसेवा मुख्य परीक्षेची जाहिरात, पूर्व परीक्षा, मुलाखत, परीक्षेचा अंतिम निकाल आणि शिफारस हे सर्व टप्पे पूर्ण झाले आहेत. परंतु, कोरोनाच्या कारणास्तव पात्र उमेदवारांना अद्याप नियुक्ती पत्रक देण्यात आलेले नाही. त्यामुळे २,१८५ पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र लवकर मिळावी अशी मागणी आज (शनिवार) भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इमेलद्वारे केली आहे.

आ. चंद्रकांतदादा म्हणाले की, महाराष्ट्रातील जवळपास २,१८५ उमेदवारांची काहीही चूक नसताना त्यांना हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय संविधान पीठाने दिलेल्या अंतिम निकालामध्ये ९ सप्टेंबर २०२० पूर्वी पूर्ण झालेले सर्व शैक्षणिक प्रवेश आणि भरती प्रक्रिया या अबाधित राहतील असा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांना आपल्या भविष्याची चिंता असून या नियुक्तीबाबत त्यांच्या तीव्र भावना आहेत.  उच्चशिक्षित असून देखील बेरोजगार असण्याची एक प्रकारची नकारात्मक भावना वाढत आहे.

त्यामुळे शेतकरी आत्महत्येनंतर आता सुशिक्षित बेरोजगार म्हणून आत्महत्ये सारखे टोकाचे पाउल उचलण्याची त्यांची मनस्थिती बनत चालली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री या नात्याने २,१८५ पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र लवकर मिळावी अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे.