कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिका ही राज्यात सर्वांत जास्त घरफाळा आकारणारी महापालिका आहे. असे असताना २०२१-२२ साठी घरफाळा आणि पाणीपट्टीमध्ये पुन्हा वाढ करण्याचा प्रस्ताव नागरिकांची लूट करणारा आहे. त्यामुळे ही प्रस्तावित वाढ रद्द करावी, अशी मागणी ताराराणी आघाडीच्या सुनील कदम, राजसिंह शेळके, विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, आशिष ढवळे यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर महानगरपालिकेकडून राज्यात सर्वांत जास्त घरफाळा आकारणी करणारी महानगरपालिका आहे. नव्याने प्रस्तावित घरफाळा व पाणीपट्टी वाढीने नागरिकांवर कराचा नाहक बोजा वाढणार आहे. मुळात घरफाळा आकारणीची पध्दत हीच चुकीची व बेकायदेशीर आहे. महापालिका हद्दीतील अनेक मिळकती हया शून्य बिलिंगच्या आहेत. अशा हजारो मिळकती आहेत. त्यामुळे या मिळकतीतून कोणत्याही स्वरूपाची मिळकत होत नाही. पाणीपट्टीबाबतही हीच परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी विना मिटर पाणी सुरू आहे. अनेक ठिकाणी मीटर बंद अवस्थेत आहेत व त्यांची पाणी आकारणी बिले मागील सरासरीवरून अंदाजे केली जाते. शहरात अनेक ठिकाणी पाण्याच्या मुख्य पाईपलाईन ही खराब, फुटलेली आहे व त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे योग्य चौकशी करून सर्व मिळकतींना घरफाळा लागू करण्याची कार्यवाही करावी, तसेच तसेच पाणीमीटर, कनेक्शनची योग्य दुरुस्ती केल्यास घरफाळावाढीचा कटू निर्णय घ्यावा लागणार नाही.