ग्राहकांकडे मास्क नसल्यास व्यापाऱ्यांना दंड करण्याचा आदेश रद्द करा   

0
18

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २७ नोव्हेंबररोजी नविन आदेश काढले आहेत. त्यानुसार मास्क नसलेला ग्राहक दुकानात आढळल्यास दुकानदारांना १० हजार रुपये दंडाचा उल्लेख आहे.  तरी हा आदेश तातडीने रद्द करण्यात यावा, या मागणीचे निवेदन इचलकरंजी नागरिक मंच प्रणित व्यापारी असोसिएशनच्या वतीने नायब तहसीलदार शरद काटकर यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी मास्क घातला पाहिजे, यासाठी आम्ही जरूर काळजी घेऊ, प्रबोधनही करू, परंतु व्यापाऱ्यांनी व्यवसाय करावा का ग्राहकांचे मास्क तपासत बसावे ? अनावधानाने विनामास्क ग्राहक सापडल्यास त्याची शिक्षा व्यापाऱ्यांना म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी. हे व्यापाऱ्यांवर जुलमी व अन्यायी परिपत्रक सरकारने तातडीने रद्द करावे. कोणीही व्यापारी अशा प्रकारचा दंड भरणार नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्था अथवा पोलिसांकडून जबरदस्तीने दंडवसुली करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला सामूहिकरित्या प्रतिकार केला जाईल, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.

यावेळी इनामप्रणित व्यापारी असोसिएशनचे शितल मगदूम, मधुकर पाटील, राम आडकी, रमेश पवार, संजय डाके, सुरेश जमदाडे, उदयसिंह निंबाळकर, विकास चौगुले, अमोल ढवळे, दीपक पंडित, अतुल निटवे, महेंद्र जाधव, अभिजित पटवा आदीसह व्यापारी बांधव उपस्थित होते.