गडहिंग्लज (प्रतिनिधी) तालुक्यात इतके दिवस फक्त निवडणुकीची चर्चा सुरू होती. आता अर्ज माघारीनंतर आता खऱ्या अर्थाने निवडणुकीला रंग चढू लागला आहे. तालुक्यातील सहा गावांनी आदर्शवत काम केले असून गावाची ग्रामपंचायत  बिनविरोध केली आहे. यामध्ये सावतवाडी, गिजवणे, तेगिनहाळ, चंदनकुड, येनेचंवडी, दुगुनवाडी या गावांचा समावेश आहे. आता उर्वरित गावात दुरंगी, तिरंगी लढती होत असून उमेदवारांचे पै पाहुणे, गावातील मुंबईकर ग्रामस्थ आता प्रचारात सक्रिय होत आहेत.

मतदानास अजून अवधी असला तरी आतापासूनच साम,दाम,दंड,भेद याचा वापर सुरू असून अनेक गावात जेवणावळी सुरू झाल्या आहेत. अनेक मोठ्या गावात नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काही ठिकाणी आपल्या सोयीनुसार नेत्यांनी आघडी केल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यातील एकूण ३५८ जागांसाठी ८७१ उमेदवार रिंगणात आहेत. पण सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढले जाणार असल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. गावातील कट्टयावर, दूध संस्थेत, शेतात  सगळीकडेच फक्त निवडणुकीची चर्चा असून अनेक ठिकाणी भावकी – भावकी विरोधात असल्याचे दिसून येत आहे.