भटकी जनावरे पकडण्याची मोहीम तीव्र करणार : डॉ. विजय पाटील

0
112

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील भटकी जनावरे पकडण्याची घडक मोहीम महापालिकेने हाती घेतली असून गेल्या महिनाभरात शहरातील २५ भटकी जनावरे पकडून ती पांजरपोळ संस्थेत सोडण्यात आली. यापुढे भटकी जनावरे पकडण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांनी दिली.

शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि रस्तावर भटक्या जनावरांचा वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. ब-याचदा अपघातही होतात, हे सर्व टाळण्यासाठी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या आदेशानुसार आरोग्य विभागामार्फत भटकी जनावरे पकडण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे.

या मोहिमेअंतर्गत रस्त्यावर तसेच बाजारपेठांमध्ये आढळणारी तसेच वाहतुकीस अडथळा ठरणारी भटकी जनावरे पकडून त्यांना पांजरपोळ संस्थेत सोडण्याबरोबरच संबंधित जनावरांच्या मालकावरही कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले आहेत.

भटकी जनावरे ही प्रामुख्याने सदरबाजार, ताराबाई पार्क, गंगावेश, महानगरपालिका परिसर, राजारामपुरी, प्रतिभानगर, जवाहरनगर आदी परिसरातील जनावरांचा समावेश आहे. याकामी आरोग्यविभागाची विशेष पथके कार्यरत असून या मोहिमेसाठी पांजरपाळ संस्था आणि सिध्दगीरीमठाचे सहकार्य मिळत आहे. या मोहिमेत आरोग्य निरीक्षक विनोद नाईक आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.