गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान १५ तारखेला होणार असून आज (बुधवार) सायंकाळी ५.०० वाजता जाहीर प्रचाराची सांगता झाली. गेले पंधरा दिवस प्रचाराच्या रणधुमाळीने संपूर्ण तालुका ढवळून निघाला असून अनेक ठिकाणी साम,दाम,दंड,भेद याचा सरास वापर झाला आहे.

तालुक्यात अनेक ठिकाणी दुरंगी तिरंगी लढती होत असून चुरशीची इर्षा पाहायला मिळत आहे. निवडणूक अंतिम टप्प्यात असल्याने सर्वच उमेदवारांसाठी उद्याची रात्र महत्वाची असणार आहे. प्रचाराची जाहीर सांगता जरी झाली असली तरी उमेदवारांनी गावातील मोठी संख्या असलेल्या कुटुंबांवर गठ्ठा मतदानासाठी लक्ष केंद्रित केले आहे. आता कार्यकर्ते आता मतदार यादीच्या स्लीप वाटपाच्या कामाला लागले असून जास्तीत जास्त मतदाराना केंद्रांपर्यंत आणण्याचे प्रयत्न आतापासूनच सुरू आहेत. तालुक्यात ३५१ जागांसाठी ८७१ उमेदवार रिंगणात असल्यामुळे मोठी चुरस आहे. प्रशासन देखील सज्ज झाले असून उद्या सकाळी ८ वाजता एम. आर. हायस्कूल येथे मतदान साहित्य वाटप होणार आहे.