कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घटनेसंबंधी केलेल्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले. यामुळे व्टिटरवरून त्यांना खुलासा करावा लागला. चुकून बोलण्याच्या ओघात घटना दुरूस्ती ऐवजी बदल हा शब्द निघाला असावा, अशा आशयाचे त्यांनी व्टिट केले आहे.

खासदार संभाजीराजे पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. नुकसानग्रस्त प्रदेशाची पाहणी दरम्यान त्यांनी मराठा आरक्षणास न्यायालयाने दिलेल्या स्थगितीसंबंधी मत मांडले. त्यावेळी घटनेसंबंधी त्यांनी वक्तव्य केले. ते विविध माध्यमातून प्रसिध्द झाल्यानंतर काही संघटना नाराज झाल्या. त्या सोशल मिडियाव्दारे खासदार संभाजीराजे यांच्यावर टीका सुरू केली. म्हणून त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा खुलासा केला आहे. खुलाश्यात ते म्हणाले, ‘मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी घटना दुरूस्तीसाठी अभ्यास करणार आहे. मला हे वाक्य बोलायचे होते. चुकून बोलण्याच्या ओघात घटना दुरूस्ती ऐवजी बदल हा शब्द निघाला असावा. पत्रकारांनी माझी मूळ भावना समजून न घेता चुकीच्या पध्दतीने बातम्या लावल्या. यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या. त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो’, अशा आशयाचे त्यांनी व्टिट केले आहे.