कोल्हापुरात सोने खरेदी करतायं ? जोखीम पत्करतायं ? : त्याआधी ‘हे’ वाचा !

0
5817

कोल्हापूर (सरदार करले) : सराफ बाजारात म्हणजे आपल्या गुजरीत आणि आजूबाजूच्या सराफ पेढीवर व्यवहार करणे अधिक जोखमीचे झाले आहे. नावाजलेल्या काही पेढीवर केलेला व्यवहार अनेक ग्राहकांना डोकेदुखी बनली आहे. केवळ ग्राहकच नाही तर अन्य सराफ व्यावसायिक त्यांच्यापासून चार हात लांबच राहू लागले आहेत.

स्वतःला ‘नवकोट नारायण’ म्हणवणाऱ्या काही सराफ बंधूंना काही ‘हाव’ सुटता सुटत नाही. ग्राहकांची अक्षरशः लूट सुरू असून व्यवहार करणारे अनेकजण चांगलेच अडकले आहेत. लाखो रुपये जमा करून तयार करायला टाकलेल्या दागिन्यांसाठी आणि मोडीत घातलेल्या सोन्याच्या पैशासाठी येरझाऱ्या मारून अनेकांना चक्कर यायची वेळ आली आहे.

अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि आकर्षक दुकानामुळे ग्राहक भुलतात खरे. पण,  ‘झक मारली आणि या दुकानात आलो’ अशी म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. वेळ प्रसंगाने दागिने मोडण्याची वेळ एखाद्यावर आलीच तर असे ग्राहक या ‘नवकोट नारायणा’च्या दुकानात जातात. घसारा वगैरे वजा करून दागिन्यांची किंमत केली जाते. रोख रक्कम न देता ग्राहकाच्या हातात धनादेश (चेक) ठेवला जातो. तो खात्यावर भरला जातो. पण, प्रत्यक्षात तो काही वटत नाही आणि खात्यावर पैसे जमा होत नाहीत. पैशासाठी ग्राहकाला चकरा मारायची वेळ येते. नव्या दागिन्यांसाठीही आज उद्याच्या शब्दावर झुलवले जाते. सुशिक्षित ग्राहकांनाही त्याचा फटका बसला आहे.    

राजकारणामुळे अडचणीत आलेल्या एका उद्योगपतीच्या पत्नीने याच पेढीकडून त्या वेळी एक किलो वजनाची श्री गणेशाची मूर्ती बनवून घेतली. प्रचंड अडचणीत आल्यावर ती मूर्ती त्याच पेढीवर विकायला नेल्यावर त्यांचे पितळ उघडे पडले. पन्नास टक्केच शुद्ध सोन्यापासून मूर्ती बनवली होती. त्यामुळे मूर्तीची किंमत ५० टक्केच झाली. उद्योगपतीच्या पत्नीने नंतर आत्महत्या केली. या उद्योगपतीचे कुटुंब संपले तरी अलीकडे तुमचा **** कर करीन असे म्हणण्याची पद्धत रूढ झाली आहे.

ग्राहकांचीच नव्हे तर कारागिरांचीही त्यांनी लूट केली आहे. काम द्यायचे आणि तूट म्हणून अंगावरची बाकी काढून कारागिराकडून सक्तीने वसुली करायची. वसुली होत नाही म्हटले की त्याला मारहाण करायची. नको तिथे तेजाब ओतून त्याचा छळ करायचा. काहीही झाले तरी माझा फायदा झाला पाहिजे अशी ‘हाव’ कायम ठेवायची अशी त्यांची पद्धत आहे. धंद्यात तोटा झाला अशीही काही अवस्था नाही. पण, सगळं मलाच हवं, या हव्यासापोटी असा व्यवहार केला जात असल्याची चर्चा आहे. बऱ्याच मिळकती करून ठेवल्या आहेत. मात्र ग्राहकांची लूट करायची त्यांची ‘हाव’ काही सुटत नाही, अशीही चर्चा गुजरीत सुरू आहे. ग्राहकांनीच आता शहाणं होण्याची गरज आहे. अशा भपकेबाज, लूट करणाऱ्यांच्या पेढीवर व्यवहार न करणे आवश्यक झाले आहे.