मुंबई (प्रतिनिधी) : मराठी मालिका  ‘फुलपाखरू’ आणि नाटकातून  अल्पावधीत लोकप्रिय झालेली अभिनेत्री हृता दुर्गुळे आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ”शक्य आहे. तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!,  अशी टॅगलाईन असलेल्या ‘अनन्या’ या चित्रपटातून हृता सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत,  ड्रीमव्हिवर एंटरटेनमेंट निर्मित आणि रवी जाधव फिल्मच्या सहकार्याने  प्रदर्शित होणाऱ्या ‘अनन्या’ या चित्रपटात हृता दुर्गुळे हिची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप फड यांनी केले आहे. तर ध्रुव दास,  रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांची निर्मिती आहे. समीर साप्तीस्कर यांनी संगीत दिले आहे. ‘अनन्या’ सिनेमाचे पहिलं मोशन पोस्टर प्रकाशित झाले आहे.

हृताने आपले अभिनयकौशल्य सिद्ध केले असून ‘अनन्या’ या व्यक्तिरेखेतूनही ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.  या चित्रपटाबद्दल  हृता दुर्गुळेने सांगितले की, ‘अनन्या’च्या माध्यमातून मी चित्रपटात पदार्पण करत असल्याने मी खूप खूश आहे.  कोरोनामुळे मागील दीड -दोन वर्षांत सगळेच अडकून पडले होते. मुळात दिग्दर्शक, निर्माता यांच्यासह आमच्या सर्वांचीच इच्छा होती की,  ‘अनन्या’ थिएटरमध्येच रिलीज व्हावा. आता ‘अनन्या’चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने आम्हाला आनंद होत आहे.