बारामती (प्रतिनिधी) : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अलिकडेच भेट घेतली होती. त्या भेटीवरून राजकीय वर्तुळात जानकर भाजपची साथ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.  यावर जानकर यांनी खुलासा केला आहे. बारामतीत एका कार्यक्रमासाठी आले  असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

जानकर म्हणाले की, माझं आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांच्याशी भांडण सुरु आहे. पण त्याचा फायदा आम्ही दुसऱ्याला होऊ देणार नाही. आपण एनडीएमध्येच राहणार आहे. गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या कारखान्याच्या कामासंदर्भात पवारांची  भेट घेतली होती.  भाजपवर आपण नाराज असलो, तरी कुठेही जाणार नाही. आपण सध्या एनडीएमध्येच आहोत आणि पुढेही एनडीएमध्येच राहणार. एखाद्या पक्षाचा पडता काळ असल्यावर आपण पळून जायचे नसते, असेही जानकर म्हणाले.