नागपूरमध्ये केंद्र सरकारच्या पुतळ्याचे दहन..

0
59

नागपूर (प्रतिनिधी) : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद आज (मंगळवार) महाराष्ट्रातही उमटले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर आक्रमक झाली आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर रस्त्यावर उतरले आहेत.

देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. आज सकाळी ८ वा. नागपूरातील बेसा चौकात ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्याचबरोबर केंद्र सरकार विरोधात रोष व्यक्त करण्यात आला. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची केंद्र सरकारने ताबडतोब दखल घेऊन तोडगा काढावा तसेच महाराष्ट्रातील शेतकरी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या पूर्ण ताकदीने सोबत आहे यासाठी हे आंदोलन करण्यात आले.