कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील हॉकी स्टेडियम परिसरातील शारदा विहार येथील बंद बंगला फोडून चोरट्याने सुमारे ६० हजारांचे सोन्याचांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी परशुराम साबु कल्लोळी (रा. २०१ ए. विंग, शारदा विहार, हाँकी स्टेडियम चौक, मंगळवार पेठ) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, १५ फेब्रुवारी रोजी कल्लोळी यांचे नातेवाईक लग्न कार्यासाठी घराच्या दरवाजास कुलूप लावून जवाहरनगर येथे गेले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्याने कल्लोळी यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. तसेच बेडरूमधील असलेल्या डेसींग टेबलमधील अर्धा तोळ्याचे कानामधील रिंग, अर्धा तोळ्याचे टॉप्स, गळ्यातील गणपतीचे लॉकेट,लहान मुलांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या आणि चांदीचा गणपती असा सुमारे ६० हजार किंमतीचा सोन्याचांदीच्या दागिने चोरट्याने लंपास केला.

संबंधित नातेवाईक घरी परत आल्यानंतर आपल्या घरात चोरी झाल्याचे निदर्शनास येताच परशुराम कल्लोळी यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.