हातकणंगले (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील जत्रा, उरूस यांचे आकर्षण असणारे व धार्मिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा याची मोठी परंपरा असणारी बैलगाडी शर्यत सुरू करण्याच्या मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्र छत्रपती शाहू बैलगाडी रेसिंग असोसिएशनच्या वतीने हातकणंगले तहसील कार्यालयावर आज (बुधवार) बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. हातकणंगले तहसीलदार प्रदीप उबाळे यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.

या मोर्चात हातकणंगले, शिरोळ तसेच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून बैलगाडी शर्यत शौकीन आपल्या बैलगाडीसह सहभागी झाले होते. रेसिंग असोसिएशनचे शिरोळ तालुका अध्यक्ष बाळासो पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. आमदार राजूबाबा आवळे, आमदार प्रकाश आवाडे, मनसे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पुंडलिक जाधव, तैयब अली मुजावर, तालुका काँग्रेस अध्यक्ष भगवान जाधव, दलित मित्र डॉ. अशोकराव माने, नामदेव खोत, तुकाराम जानकर आदींनी उपस्थिती लावून या मोर्चाला पाठिंबा व्यक्त केला.

यावेळी आमदार राजूबाबा आवळे म्हणाले की, ११ जुलै २०११ च्या परिपत्रकानुसार बैलाचे वर्गीकरण जंगली हिंस्र प्राण्यांमध्ये केले आहे. केंद्र शासनातील लोक शेतकऱ्यांच्या भावना पायदळी तुडवून चांगली सांस्कृतिक आणि कला, क्रीडाची परंपरा मोडीत काढत आहे.

जोपर्यंत बैलगाडी शर्यत सुरू होत नाही, तोपर्यंत रस्त्यावरचा संघर्ष थांबणार नाही,  असे प्रकाश आवाडे यांनी सांगितले. या मोर्चात २०० च्यावर बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. आभार अध्यक्ष बाळासो पाटील यांनी मानले.