शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी शिरोळ तहसीलवर बैलगाडी चालकांचा मोर्चा

0
51

शिरोळ (प्रतिनिधी) : बैलगाडी शर्यती पुन्हा सुरु करा, अशी मागणी करीत आज (बुधवार) शिरोळ तालुका बैलगाडी मालक-चालक संघटनेच्या वतीने‌ तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. पश्चिम महाराष्ट्र छत्रपती शाहू रेसिंग असोसिएशनच्या मान्यतेने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

मोर्चा तहसील कार्यालयासमोर पोहोचल्यावर आंदोलकांनी तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी बैलांच्या सहाय्याने मशागतीची कामे करून उदरनिर्वाह करीत असताना केंद्र शासनाने २ जुलै २०११ च्या नवीन परिपत्रकानुसार बैलांचे वर्गीकरण जंगली प्राण्यांमध्ये केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा गळा घोटण्याचे काम केंद्र शासनाने केले आहे. शेकडो वर्षांपासून गावागावात यात्रा उरूसामधील आकर्षण म्हणजे बैलगाडी शर्यत या परिपत्रकामुळे राज्यातील बैलगाडी शर्यत पूर्णपणे बंद झाले आहेत. बळीराजा बैलास लहान मुलाप्रमाणे जतन करत असतो. बैलाचे वर्गीकरण हे हिंसक व जंगली प्राण्यांमध्ये करण्यात आले आहे. त्याला या वर्गीकरणामधून मुक्त करण्यात यावे व बैलगाडी शर्यत सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.