गारगोटी  (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील कारिवडे गावाच्या जंगल हद्दीला लागून असलेल्या कांबळे यांच्या शेतात चरावयास सोडलेल्या बैलावर वाघसदृश प्राण्याने हल्ला केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्राण्याने बैलाला  ५० ते ६० फुटांपर्यंत फरफटत नेऊन त्याच्या शरीराचा पाठीमागील काही भाग फस्त केला.  या घटनेमुळे  परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शेतकरी व ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार,  मारुती शंकर देसाई आपली बैलजोडी व गुरेढोरे घेऊन मंगळवारी सकाळी ९ वाजता जंगलात गेले होते. जनावरे सोडून उंबराच्या झाडाखाली बसले होते.   काही वेळातच जनावरांवर हल्ला झाल्याचा आवाज त्यांच्या कानावर आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता वाघ सदृश प्राणी बैलावर तुटून पडल्याचे त्यांना दिसले.

त्यानंतर त्यांनी आरडाओरडा  करत तेथून पळ काढला. आणि जवळच  गवत कापणीसाठी आलेल्या लोकांना  घटनेची माहिती दिली. तोपर्यंत त्या प्राण्याने बैलाला फरपटत नेऊन त्याच्या मागील मांडीचा भाग खाऊन टाकला होता.  बैल गतप्राण झाला होता. दरम्यान, वन विभागाचे वनपाल बी.एस.पाटील व वनरक्षक नामदेव चौगले घटनास्थळी १२.३० वाजता पोहोचले. त्यांनी रितसर पंचनामा  केला.

वनविभागाने ही शिकार थोराड बिबट्याने केल्याचा दावा केला आहे. पण जाणकार वन्य जीव अभ्यासकांनी हा दावा खोडून काढत हा हल्ला पट्टेरी वाघानेच केला असल्याचा निष्कर्ष काढला आहे.

याबाबत कोल्हापूरचे निवृत्त सहाय्यक वनसंरक्षक भरत पाटील म्हणाले की,  हा हल्ला पट्टेरी वाघानेच केला आहे. बिबट्या वाघ हा शक्यतो शेळी, मेंढी, हरीण, भेकर अशासारखे प्राणी मारून खात असतो. वाघ हा मोठ्या जनावराची शिकार करण्यात पटाईत आहे.  तो पुढून हल्ला करतो. नरडे पकडतो. हिरड्या फोडतो आणि सावजाला गतप्राण करतो. आणि सुरक्षितस्थळी मांसाचा भाग नेऊन खात राहतो. मांस खात असताना तो मांडीच्या मांसाचा लगदा तोडून खात असतो.  मात्र, बिबट्या अगोदर आतडी, कोथळा खातो. हा हल्ला पट्टेरी वाघानेच केला आहे.

जर हा हल्ला वाघानेच केला असेल तर जिल्हयातील जंगलात पट्टेरी वाघ नाही म्हणणाऱ्या  वनविभागाला ही मोठी चपराकच म्ह्णावी लागेल. मागील काही वर्षात तळकोकणातून चितळ  घाटमाथ्यावरच्या जंगलात आली आहेत. याचा अर्थ पाठोपाठ पट्टेरी वाघ आल्याची ही चिन्हे आहेत. वाघाच्या या जबरी हल्याने परिसर धास्तावला आहे.  जंगलामध्ये कोणीही जाऊ नये, अशी सूचना वनविभागाने केली आहे. जंगलात गवताळ पट्टे असल्याने हल्ला करणाऱ्या वाघाच्या पायाचे ठसे मिळत नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.