मुंबई (प्रतिनिधी) : बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी ऊर्फ डी. एस. कुलकर्णी यांच्या विरोधात ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या खटल्यामध्ये त्यांची पत्नी हेमंती यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयामध्ये वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी या प्रकरणामध्ये कुलकर्णी यांची बाजू मांडली.  या निर्णयामुळे तब्बल तीन वर्षानंतर डीएसके’ समूहाला दिलासा मिळाला आहे. कुलकर्णी कुटुंबातील अनेकांना २०१८ पासून फसवणुकीच्या आरोपाखाली तुरुंगामध्ये ठेवण्यात आले आहे.

पण न्यायालयाने डी. एस. कुलकर्णी यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. या प्रकरणामध्ये शुक्रवारी न्या. डी. पी. नाईक यांच्यासमोर सुनावणी झाली होती. त्या वेळी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आता हेमंती यांना जामीन मिळाला असला, तरी डी. एस. कुलकर्णी यांच्या जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज करणार असल्याची माहिती श्रीवास्तव यांनी दिली.

२०१७ मध्ये ठेवीदाराने केलेल्या तक्रारीनंतर डीएस कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती आणि इतरांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. दोषारोपपत्रात कुलकर्णी यांनी ठेवीदारांची २ हजार ४३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या विरोधात ३३ हजार ठेवीदारांनी तक्रारी दिल्या आहेत. सर्व आरोपींना पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं आहे.