गावोगावी बच्चेकंपनीची गड-किल्ले साकारण्याची लगबग

0
366

टोप (मिलिंद कुशिरे) :  दिवाळी म्हटलं की फराळ, फटाके, शाळेला सुट्टी, नवीन कपडे आणि किल्ला या साऱ्या गोष्टी आठवतात आणि दिवाळीच्या सुट्टीतील आकर्षणाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवरायाचे गडकोट किल्ले बनवायची मुलांची सुरू असलेली लगबग.  अगदी  जोशाने आणि अगदी मनापासून एक एक दगड लावून ती वास्तू साकारली जाते.  आणि शिवरायांचे स्वप्न साकार झाल्याची चमक  या लहान- सहान मावळ्यांच्या डोळ्यात दिसून येते.

दिवाळी  आली की लहान मुलं एकत्र जमून किल्ला बनवण्याच्या तयारीला लागतात. आपल्या महाराष्ट्रातील किल्ले,  गड यांना फार प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व असून दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही फार पूर्वीपासून सुरु आहे. यामुळे  शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाची माहिती अगदी लहान वयापासून मुलांच्या मनावर बिंबवली जाते.

गावोगावी या किल्यामध्ये दोन प्रकार तयार केले जातात. पहिला प्रकार म्हणजे दगड, विटा, माती गोळा करून त्यापासून आपल्या मनातील गडाला हवा तसा आकार द्यायचा.  तर दुसरा बाजारातून लाकडी किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा तयार किल्ला विकत आणून जागेवर ठेवायचा. यासाठी जागेची, वेळेची आणि दगड-मातीची अडचण येत नाही.

या किल्ल्यामध्ये भुईकोट (सपाटीवरील किल्ला), जलदुर्ग (पाण्यातील किल्ला) आणि गिरिदुर्ग (डोंगरावरील किल्ला) असे किल्ल्याचे तीन प्रकार केलेले दिसतात. यामध्ये डोंगरी किल्लेच तयार केले जातात. गिरिदुर्ग हा  डोंगरावर शिरा, द-या, खोल कडे, सुळके आणि डोंगराच्या शिरोभागी गडासाठी काहीसा सपाटीचा भाग करुन हा किल्ला उभा करतात.