नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (सोमवार) संसदेत २०२१-२२ साठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर कोरोनामुळे ढासळलेली अर्थव्यवस्था सावरण्याचे सावट होते. सीतारमण यांनी विविध योजना सादर केल्या असल्या तरी सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका देणारी घोषणा केली. पेट्रोल आणि डिझेलवर अतिरिक्त अधिभार लावला जाणार आहे. यामुळे आधीच पेट्रोल, डिझेल दरवाढीचे असह्य चटके सोसणाऱ्या वाहनधारकांना मोठा भुर्दंड सोसावा लागणार आहे. यामुळे विरोधी पक्षांनी यावर कठोर टीका केली आहे.

या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना इंधन दरात दिलासा मिळेल अशी आशा होती, मात्र, ते राहिले बाजूलाच उलट कृषी क्षेत्रासाठी पेट्रोल आणि डिझेलवर जादा अधिभार लावत असल्याचे ‘गोंडस’ कारण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुढे केले आहे. पेट्रोलवर प्रतीलिटर अडीच तर डिझेलवर ४ रुपये अधिभार लावला जाणार आहे. त्यामुळे विविध राज्यातील आणि विविध जिल्ह्यातील स्थानिक करांची भर होऊन, पेट्रोल शंभरहून अधिक होईल, हे निश्चित आहे.

मात्र, हे अधिभार लावताना आधीचे अधिभार जसे एक्साईज ड्युटी आणि स्पेशल अतिरिक्त एक्साईज ड्युटी हटवण्यात येईल असं निर्मला सीतारमण म्हणाल्या. कोल्हापुरात पेट्रोल जवळपास ९३.५० रुपये लिटरवर पोहोचलं आहे. तर डिझेलचा दर ८४ रु. हून अधिक आहे.