पन्हाळा (प्रतिनिधी) : प्रेमविवाह केल्याच्या रागातून सख्ख्या भावाने बहिणीवर प्राणघातक हल्ला करीत कापणीच्या विळ्याने तिचे मुंडके उडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बचाव करण्याच्या प्रयत्नात सुदैवाने तिच्या पाठीवर, हातावर वार झाले. यामुळे अनर्थ टळला. हा खळबळजनक प्रकार आज (शुक्रवार) दुपारी पन्हाळागडाच्या पायथ्याशी असलेल्या गुडे या गावात घडला. या प्रकारानंतर पळून गेलेल्या नागेश पांडुरंग तेली (वय २३, रा. निगवे, ता. करवीर) या हल्लेखोरास पन्हाळा पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, निगवे येथील नागेश तेली याच्या बहिणीचे गुडे येथील अविनाश चिकलकर (वय २७, रा. गुडे, ता. पन्हाळा याचेबरोबर प्रेमसंबंध होते. घरातील लोकांचा विरोध झुगारून तिने सुमारे वर्षभरापूर्वी अविनाश याचेबरोबर विवाह केला. सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते, मात्र बहिणीने प्रेमविवाह केल्याने नागेश तेली याच्या मनात राग होता. या रागातूनच आज दुपारी त्याने गुडे येथे बहिणीच्या घरी तिच्यावर विळ्याने खुनी हल्ला चढवला. तिचे मुंडके उडविण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि तिच्या पाठीवर आणि हातावर वार झाले. तिने आरडाओरडा केला. नागेश याने यानंतर पलायन केले.

चिकलकर परिवाराने दिलेल्या फिर्यादीनुसार पन्हाळा पोलिसांनी संशयित नागेश याला अटक केली आहे. अचानक घडलेल्या या प्रकाराने गावासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.