मुंबई (प्रतिनिधी) : सततच्या इंधन  दरवाढीमुळे  सर्वसामान्य  जनतेचे कंबरडे मोडले आहे.  यावरून  विरोधकांकडून मोदी सरकारला धारेवर धरले आहे. तर  शिवसेनेनेही ‘सामना’च्या अग्रलेखातून निशाणा साधला आहे. राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा, अशा शब्दांत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.   

अग्रलेखात म्हटले आहे की, लोकांना जगण्याचा हक्क आहे व त्यातही जीवनावश्यक गोष्टींचे भाव नियंत्रित ठेवणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. केंद्रातील सरकारला आपल्या कर्तव्याचा विसर पडला असेल, तर जनतेने हा स्मृतिभ्रंश दूर करायला हवा. राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा. त्यामुळे रामभक्तांच्या चुली पेटतील व श्रीरामही खूश होतील. लोकांनी वाहने खरेदी केली ती कामधंद्याच्या सोयीसाठी. ही सर्व वाहने रस्त्यावर सोडून एक दिवस लोकांना घरी जावे लागेल. मग बसा बोंबलत!, असा इशाराही देण्यात आला  आहे.

तिकडे केंद्रातील भाजप सरकार ‘सोनार बंगला’ घडविण्यासाठी कोलकात्यात तळ ठोकून बसले आहे आणि देशाला पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने होरपळून टाकले आहे. या महागाईवर सरकार पक्ष मूग गिळून गप्प बसला आहे. एरवी महाराष्ट्रात ऊठसूट आंदोलने करणारा भाजपनामक विरोधी पक्ष पेट्रोल-डिझेल दरवाढीवर गप्प का बसला आहे?, असा सवाल करून  शिवसेनेने  भाजपवर नेम धरला.