‘गोडसाखर’ला गतवैभव मिळवून द्या : आमदार मुश्रीफ

0
4

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : ‘गोडसाखर’च्या सभासद शेतकऱ्यांनी पंचवार्षिक निवडणुकीत मोठ्या विश्वासाने एकतर्फी निकाल दिलेला आहे. या कारखान्याला गतवैभव मिळवून देऊन शेतकऱ्यांच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण करा, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीपूर्वी गडहिंग्लज विश्रामगृहात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मुश्रीफ बोलत होते. यावेळी त्यांनी अध्यक्षपदासाठी डॉ. प्रकाश शहापूरकर व उपाध्यक्षपदासाठी प्रकाश चव्हाण ही नावे या आधीच निश्चित झाली असल्याचीही घोषणा केली.

आमदार मुश्रीफ म्हणाले, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्यान्नवर, प्रा. किसनराव कुराडे, विनायक ऊर्फ अप्पी पाटील, संग्रामसिंह कुपेकर, ॲड. हेमंत कोलेकर आदी प्रमुख नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी या आघाडीच्या विजयासाठी प्रचंड परिश्रम केले आहेत. हीच मंडळी कारखाना सध्या असलेल्या दुष्टचक्रातून बाहेर काढू शकतील, हा विश्वास शेतकऱ्यांनी मतपेटीतून व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहूया आणि हा कारखाना एकमताने सध्याच्या दुष्टचक्रातून बाहेर काढूया.

नूतन चेअरमन प्रकाश शहापूरकर म्हणाले, ‘गोडसाखर’ला गतवैभव मिळवून देण्याच्यादृष्टीने आमदार हसन मुश्रीफ यांनी ज्या-ज्या अपेक्षा आणि सूचना व्यक्त केल्या आहेत, त्या शंभर टक्के पूर्ण होतील.

उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांनी दाखविलेला प्रचंड विश्वास तर सार्थ ठरवूच. तसेच कारखान्याला गतवैभव मिळवून देण्यामध्ये कामगारांची फार मोठे पाठबळ संचालक मंडळाला आहे. शहापूरकर म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून, अडचणीतून कारखाना बाहेर काढण्यासाठी काटकसर  करावीच लागेल. संचालक मंडळाच्या बैठकीत काजू, बदाम तसेच इतर काहीही मिळणार नाही. फक्त चहा आणि बिस्किटेच मिळतील.

यावेळी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्यान्नवर, प्रा. किसनराव कुराडे, विनायक उर्फ अप्पी पाटील, संग्रामसिंह कुपेकर, उदयराव जोशी, सोमगोंडा आरबोळे, बसवराज आजरी, अरुण बेल्लद, गुंडेराव पाटील, राहुल शिरकोळे, महेश सलवादे आदी उपस्थित होते.