कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. लॉकडाऊन काळातील लाईट बिलांवर, तीन महिन्याची सवलत देण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले होते. मात्र दिवाळीनंतर गोड बातमी देण्याची ऊर्जामंत्र्यांची घोषणा हवेत विरली, असा घणाघात शेट्टी यांनी केला. ते कोल्हापुरात बोलत होते.

शेट्टी यांनी महावितरणला रोखठोक इशारा दिला आहे. घरगुती लाईट बिल ऊर्जामंत्री आणि महावितरणने तोडून दाखवावे. त्यांना आमच्या परीने उत्तर देऊ. हिम्मत असेल तर घरगुती कनेक्शन तोडून दाखवावे. मंत्र्यांनी राज्यातील दौरे करावे आणि घरगुती लाईट बिलासंदर्भात नागरिकांचे मत घ्यावे, असे आवाहनही शेट्टी यांनी केले. राज्य सरकारने लाईट बिल माफ केले पाहिजे. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. सरकारशी दोन हात करण्यासाठी आम्ही तयार आहोत. ऊर्जामंत्र्यांनी काय करायचे ते करावे.