एकमेकांची डोकी फोडा, पण वीज बिलाचं तेवढं मिटवा..!

देवेंद्र फडणवीस वीज बिलाच्या मुद्द्यावरुन संतापले

0
180

मुंबई (प्रतिनिधी) : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आज (मंगळवार) दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीज बिलाच्या मुद्द्यावरुन सरकारला धारेवर धरले. तुम्हाला एकमेकांची डोकी फोडायची असतील, तर फोडा, पण वीज बिलाचे तेवढे मिटवा, अशा शब्दांत फडणवीस यांनी संताप व्यक्त केला.  

फडणवीस म्हणाले की, सरकारने राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. ज्यांनी वीज वापरली त्यांना विजेचे बिल भरावे लागेल, याबाबत आमचे दुमत नाही, पण ज्यांनी वीज वापरलीच नाही, त्यांनी बिल का भरायची ? असा संतप्त सवालही फडणवीस यांनी केला.

यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी अ‍ॅव्हरेज लाईट बिल बंद करा, अशा सूचना सरकारला केल्या. महाराष्ट्रात अ‍ॅव्हरेज बिल देण्याची पद्धत तातडीने थांबवली पाहिजे. कुठंतरी एखाद्याचं घर नाही, मीटर नाही त्यांनाही बिल पाठवली जातात, हे अ‍ॅव्हरेज बिलामुळेच होत आहे. त्यामुळे हे थांबवले पाहिजे, अन्यथा सातत्याने हा विषय सभागृहात येईल, असे पटोले यांनी सांगून यापूर्वीच्या सरकारपासूनही तेच सुरू असल्याचे सांगितले.