कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील बेले येथे जागेच्या वादाच्या कारणातून धनाजी सदाशिव कारंडे (वय ३२) याचा डोक्यात बांबू मारून खून केल्याप्रकरणी दोघांना न्यायालयाने जन्मठेपेसह वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. विजय दिनकर कारंडे (वय ४०) राजेंद्र कारंडे (वय ३७, दोघेही रा. बेले) अशी त्यांची नावे आहेत.

बेले येथील धनाजी कारंडे याने दोन वर्षांपूर्वी घराचे बांधकाम काम करण्यासाठी चिरा दगड आणला होता. हा दगड ठेवण्यासाठी २८ फेब्रुवारी २०१८ रोजी धनाजी कारंडे व नामदेव कारंडे हे घराशेजारील रिकामी जागेची साफसफाई करत होते. त्या वेळी या ठिकाणी आलेल्या विजय दिनकर कारंडे यांने ही जागा आमची असून येथे दगड ठेवू नका असे म्हणत धनाजी व नामदेवशी वाद घातला. वादावादी वाढल्यानंतात विजय कारंडे, राजेंद्र कारंडे व दिनकर कारंडे यांनी धनाजी व नामदेवला बेदम मारहाण केली. हा वाद मिटवण्यासाठी आई सखुबाई कारंडे गेली असता तिलाही मारहाण करण्यात आली.

विजयने धनाजीच्या डोक्यात बांबूने प्रहार केले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. राजेंद्र व दिनकर यांनी नामदेव व सखुबाई यांना काठीने मारहाण करून जखमी केले होते. या तिघांनाही सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. धनाजी कारंडे यांची प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी त्याला एका खाजगी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा ८ मार्च २०१८ रोजी मृत्यू झाला होता. याप्रकरणी नामदेव कारंडे यांने इस्पुर्ली पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती.

त्यानुसार विजय कारंडे, राजेंद्र कारंडे व दिनकर कारंडे यांच्यावर खून व मारहाणीचा गुन्हा दाखल करून यांना अटक  करण्यात आली. या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश एम. के. जाधव यांच्या न्यायालयामध्ये पूर्ण झाली. न्यायालयाने आज (शुक्रवार) याबाबतचा निकाल देताना विजय कारंडे व राजेंद्र कारंडे यांना जन्मठेपेसह प्रत्येकी वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.