दोन्ही समाजानी एकत्रीत बसून मार्ग काढावा अन्यथा..! : राजेश खांडवे

0
842

टोप (प्रतिनिधी) : टोप गावात दोन गटात हाणामारीमुळे तणावाचे वातावरण झाले आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका, गावात शांतता राखा अन्यथा कारवाई करण्याचा इशारा सपोनि. राजेश खांडवे यांनी टोपमधील मराठा समाज आणि वडार समाजाला पोलीस ठाण्यात बैठक बोलावून दिला.

टोपमध्ये दि. २० रोजी दगड उत्खननावरुन मराठा आणि वडार समाजात वाद होवून हाणामारी झाली होती. यात दोन्ही गटातील काहीजण जखमी झाले होते. पण हा वाद आपापसात मिटला पण पुन्हा मंगळवारी पुन्हा गावात धुसफुस सुरू झाली. गुरुवारी मराठा समाजाच्यावतीने कल्लेश्वर मंदीरात बैठक घेतली गेली. तर शुक्रवारी वडार समाजाने बैठक घेतली.

शिरोली पोलीसांना हे समजल्यावर पोलीस ठाण्याचे सपोनि. राजेश खांडवे यांनी टोपमधील मराठा समाज आणि वडार समाजाच्या लोकप्रतिनिधींना पोलीस ठाण्यात बोलवून घेतले. गावात अनेक सर्वसामान्य लोक राहतात त्यांना तुमचा कोणताही त्रास होता कामा नये. गावबंद, मुकमोर्चा, मोबाईल सोशल मीडियावर कोणतेही वादग्रस्त मेसेज जाता कामा नयेत. दोन समाज एकत्र बसून मार्ग काढा. कोणताही अनुचित प्रकार घडता कामा नये. अन्यथा पोलीस स्वतः फिर्यादी होवून गुन्हे दाखल करणार असे खांडवे यांनी बैठकीत सांगितले.

या बैठकीला टोपचे पोलीस पाटील महादेव सुतार, विठ्ठल पाटील, उदय गायकवाड, अविनाश कलकुटगी, शिवाजी पोवार, बापू पोवार, रंगराव भोसले, सागर गायकवाड उपस्थित होते.