मुंबई (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबतची युती तोडली तर आम्ही त्यांच्याशी बोलायला तयार होतो; पण तरीही ते दोन्ही काँग्रेससोबत आहेत. ठाकरेंविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात  गेलो नाही. उद्धव ठाकरेंबद्दल अजूनही आदर आहे. आम्ही ठाकरे कुटुंबाच्या विरोधात नाही. शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रयत्न सुरु होता, असा थेट आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला.

नवीन सरकार स्थापण्याबाबत पुढील रणनीती ठरविण्यात येईल. मात्र, उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत. आम्ही शिवसेनेत आहोत; परंतु समविचारी म्हणून भाजपसोबत जात आहोत, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यावेळी आम्ही कोणतेही सेलिब्रेशन केलेले नाही. ते आमचे नेते आहेत आणि पुढेही असणार आहेत. त्यांच्याबद्दलचा आदर आमच्या मनात कायम आहे. ज्यांना घेऊन सत्ता स्थापन केली, त्याला आमचा विरोध होता. ही भूमिका कायम होती आणि आहे. आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंत्रिमंडळाबाबत चर्चा झालेली नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात कोण असेल याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. शिंदे यांच्यासोबत आलेल्या आमदारांच्या मंत्रिपदाबाबत काहीही निर्णय झालेला नाही, असे केसरकर यांनी सांगितले.