कोल्हापूर (प्रतिनिधी): कोरोनाच्या काळात जिल्हा परिषदमार्फत घाई गडबडीत केलेल्या ८० कोटीच्या खरेदीत जवळपास ३५ कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून याची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी जी.प. सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी केली. तसेच या समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी दौलत देसाई आहेत. त्यांना या घोटाळ्याबाबत विचारले असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली आहे.

कोरोनाच्या काळात प्रशासनाने नियमबाह्य साहित्य खरेदी केलेली आहे. खरेदीची ज्या दिवशी अधिसूचना निघाली त्याच दिवशी घाईगडबडीत कमिटी गठीत करण्यात आली. या कमिटीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी दौलत देसाई, सह अध्यक्ष माजी सीईओ अमन मित्तल, सदस्य जिल्हा शल्यचिकित्सक तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे हे सदस्य सचिव आहेत. या काळात खरेदी केलेले साहित्य हे सह अध्यक्ष अमन मित्तल यांनी कोणालाही विश्वासात न घेता स्वतःच्या सहीने खरेदी केलेले आहे. सदरची खरेदीही ई-टेंडर प्रसिद्ध न करता थेट कोटेशन घेऊन केली आहे. यासाठी फक्त तीनच कंपनीने टेंडर भरले होते. या कंपन्या नेमक्या कोणाच्या हा प्रश्न उपस्थित होत आहे.

पहिली खरेदी हि एक कोटीपर्यंत आपत्ती व्यवस्थापन म्हणून केल्यानंतर त्यानंतरची खरेदीही ई-टेंडर पद्धतीने करायला हवी, असे न करता नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या काही जवळच्याच नातेवाईकांनाच याचा ‘लाभ’ देण्यात आला आहे. इचलकरंजी आणि कोल्हापूर परिसरातील हे पुरवठादार नातेवाईक कोणाचे ? यांच्यावर राजकीय वरदहस्त कोणाचा आहे, याचापण पुढच्या काळात शोध घेतला जाईल. असे निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

याबाबत केलेल्या लेखापरीक्षण अहवालात शेरे मारले आहेत. ज्या कंपनीने साहित्य पुरवले त्यातील बऱ्याच कंपन्यांचे रजिस्ट्रेशन त्याच दिवशी झाले आहे. काही पुरवठादर हे जीएसटीधारक नसल्याचे सांगण्यात आले. ज्यादा दराचे कोटेशन पास केले आणि कमी दराचे कोटेशन नाकारले. यामध्ये टेक्सटाईल कंपनीकडून इलेक्ट्रॉनिक साहित्य, फौंड्रीकडून एन ९५ मास्क खरेदी केल्याचे दिसत असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले आहे.

जिल्हा आरोग्याधिकारी सोडून कंत्राटी कामगाराला अधिकार..?

तर या समितीचे सचिव असलेल्या जिल्हा आरोग्याधिकारी यांनी आपल्याकडील कंत्राटी कामगार असलेल्या नितीन लोहार यांना खरेदीचे मोठे अधिकार कसे काय देण्यात आले असा संशय व्यक्त केला. ही बिले अदा करताना जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. साळे यांची सही न घेता सह अध्यक्ष मित्तल यांनी आपल्या सहीने सर्व बिले काढली. कंत्राटी कर्मचारी साहित्य खर्चासाठी गठीत केलेल्या समितीचे सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांना खरेदी प्रक्रियेत सहभागी करून न घेता लेखा व्यवस्थापक लोहार यांच्या सहीने सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे.

डॉ. साळेना बाजूला ठेवून साहित्य खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप निंबाळकर यांनी केला. हि माहिती देण्यास प्रशासनाने टाळाटाळ केल्याने उपोषणाचे शस्त्र बाहेर काढल्यावर माहिती मिळाली. स्वतः काहीतरी ‘अर्थ’ शोधण्यासाठी चुकीच्या पद्धतीने खरेदी केलेल्या व्यवहारामध्ये अंदाजे ३५ कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे. एन९५ मास्क, सॅनिटायझर,  पिपीई कीट, ऑक्सिमीटर, ऑक्सिजन सिलेंडर या सर्व साहित्यांच्या बाजारभावाप्रमाणे असलेल्या किमतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त किमती लावल्याचे दिसून येते. या सर्व प्रकरणाची कॅगमार्फत चौकशी व्हावी. तसेच यासाठी नियुक्त होणारा अधिकारी कसल्याही प्रकारचा दबाव न घेणारा आणि निपक्ष असावा. यातून निष्पन्न झालेल्या दोषींवर कारवाई करुन संबंधीत रक्कम वसूल करावी, अशीही मागणी निंबाळकर यांनी केली आहे.