बांदा : रक्षाबंधनाच्या सणादिवशी उत्तर प्रदेशातील बांदा येथे गुरुवारी दुपारी मार्का पोलिस ठाण्याच्या हद्दीत यमुना नदीच्या मध्यभागी बोट बुडाली. या बोटीत ३० हून अधिक लोक होते. आठ जण कसेतरी पोहत बाहेर आले. बोट आणि बाकीचे लोक सापडले नाहीत. आतापर्यंत चार जणांचे मृतदेह सापडले आहेत. बोट उलटून सुमारे २० जणांचा बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

बांदा येथील मरका घाटहून फतेहपूरला जाणारी बोट यमुना नदीत संतुलन बिघडल्याने बुडाली. बोटीतील ३० हून अधिक जण बेपत्ता असून, यामध्ये लहान मुलांसह २० ते २५ महिला बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. रक्षाबंधनाला राखी बांधण्यासाठी या महिला आपल्या माहेरच्या घरी जात होत्या. पाणबुड्यांनी बेपत्ता लोकांचा शोध सुरू केला असून, आतापर्यंत चार मृतदेह बाहेर काढले आहेत.

रक्षाबंधनानिमित्त समग्रा गावातील महिला व पुरुष मारका घाटावर पोहोचले होते. यमुना नदी ओलांडण्यासाठी फतेहपूर जिल्ह्यातील असोथर घाटापर्यंत जवळपास ५० लोक बोटीमध्ये बसले होते. यमुना नदीच्या मधल्या प्रवाहात येताच बोट असंतुलित होऊन उलटली. बोटीतील सर्वजण बुडाले; पण खलाशी पोहत किनाऱ्यावर आले.

बोट बुडाल्यानंतर त्यातील ३० ते ४० जणांचा शोध अद्याप लागलेला नाही. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक बसल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. बोटीतील बेपत्ता महिलांची संख्या सुमारे २० ते २५ असल्याचे  सांगण्यात येत आहे. जवळपासच्या गावातील पाणबुड्यांनी बेपत्ता लोकांचा शोध सुरू केला आहे. बांदा बोट अपघातात बोट उलटल्यानंतर घाटावर पोहत आलेले समग्रा गावचे रहिवासी गयाप्रसाद निषाद यांनी सांगितले की, बोटीत सुमारे ५० लोक होते. यामध्ये २२ महिला आणि लहान मुलेही आहेत. जोरदार वाऱ्यामुळे लाट उसळली आणि खलाशाचा तोल न राहिल्याने बोट नदीत उलटली. ते स्वत: पोहत कसेबसे किनाऱ्यावर पोहोचले.