कळे (प्रतिनिधी) : मुंबईवर २६ जानेवारी २००८ रोजी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस, जवानांना आदरांजली वाहण्यासाठी कळे (ता. पन्हाळा) येथे पोलीस ठाण्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १४० जणांनी रक्तदान केले.

हे रक्तदान कोल्हापुरातील संजीवन ब्लड बँकेच्या सहकार्याने पार पडले. या रक्तदान शिबिरात सर्व पोलीस, भागातील पत्रकार, नागरिक व युवकांनी सहभाग घेतला होता. पश्चिम पन्हाळ्यातील आजपर्यंतचे हे सर्वांत उच्चांकी रक्तदान शिबिर ठरले आहे. रक्तदात्यांना सर्टिफिकेट, कार्ड व पोलीस ठाण्याकडून भेटवस्तू देण्यात आली. या वेळी स. पो. नि. श्रीकांत इंगवले, सागर मोरे, रवींद्र पाटील, सरदार काळे, धनाजी गुरव, पोलीस कर्मचारी व पत्रकारांचे सहकार्य लाभले.