जयसिंगपूर (प्रतिनिधी) : चकोते ग्रुप व गणेश बेकरीचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब चकोते यांचा बुधवारी (दि. २४) वाढदिवस आहे. याचे औचित्य साधून महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. नांदणीबरोबरच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक येथील २५ शहरांमध्ये एकाच दिवशी शिबिर होणार आहे. आतापर्यंत चकोते ग्रुपने विधायक उपक्रम राबविले आहेत. रक्ताची  वाढती गरज ओळखून २५ शहरामध्ये शिबिर घेण्यात येणार आहे. तरी स्वयंस्फूर्तीने सामाजिक संस्था, वितरक, विक्रेते यांच्यासह रक्तदात्यांनी रक्तदान करावे,  असे आवाहन चकोते ग्रुपचे अध्यक्ष आण्णासाहेब चकोते यांनी केले आहे.  

कोरोना कालावधीत  अनेक रुग्णालये तसेच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई भासत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे  आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत चकोते ग्रुपने शिबिराचे आयोजन केले आहे.

चकोते ग्रुपच्या वतीने  आण्णासाहेब चकोते यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर,  वृक्षारोपण, रक्तदान शिबिर,  गतिमंद मुलांना दत्तक घेणे, पूरग्रस्तांना मदत, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, दुष्काळग्रस्त डफळापूर दत्तक घेऊन चारा व पाणी वाटप,  स्वच्छता अभियान,  नवजीवन नगर वाचनालयाची स्थापना, एबीसी स्कूलची निर्मिती,  ३५० बसस्थानकांची स्वच्छता असे अनेक सामाजिक उपक्रम राबवून  समाजकार्याचा  आदर्श समोर ठेवला आहे.