‘सोशल साईट फॉर सोशल वर्किंग’ ग्रुपकडून रक्तदान शिबीराचे आयोजन

विजयी दिनानिमित्त सैनिकांच्या प्रति केली कृतज्ञता व्यक्त

0
96

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय सैनिकांच्या गौरवार्थ संपूर्ण देशभर साजरा होणाऱ्या विजयी दिनाचे औचित्य साधून कोल्हापुरात ‘सोशल साईट फॉर सोशल वर्किंग’ या ग्रुपच्यावतीने आज (बुधवार) रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. सैनिकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या शिबिरात ३० हून अधिक जणांनी रक्तदान केले.

१६ डिसेंबर १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताने विजय मिळवला. पाकिस्तानाने भारतापुढे शरणागती पत्करली आणि पूर्व पाकिस्तान (बांगलादेश  वेगळा झाला. भारत विजयी झाला, मात्र या युद्धात ३९०० भारतीय सैनिक शहीद तर ९८५१ सैनिक जखमी झाले. तेव्हापासून १६ डिसेंबर हा दिवस भारतभर ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या युद्धात १०२५० भारतीय सैनिकांनी मातृभूमीसाठी आपले रक्त सांडले. त्यांच्या या कार्याला अभिवादन करण्यासाठी कोल्हापुरातील ‘सोशल साईट फॉर सोशल वर्किंग’ या ग्रुपने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.

सोशल माध्यमांच्या सहाय्याने समाजातील गरजू व्यक्तींना मदत करण्याच्या हेतूने १४ नोव्हेंबर रोजी चिल्ड्रन दिनाचे औचित्य साधत कोल्हापुरातील युवकांनी एकत्र येवून ‘सोशल साईट फॉर सोशल वर्किंग’ या ग्रुपची निर्मिती केली आहे. या ग्रुपच्यावतीने समाजातील गरजू व्यक्तींना मदत करणे, होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करणे, वृक्षारोपण आदी कार्यक्रम राबविण्यात आले आहेत.

समाज माध्यमांचा चांगल्या कामासाठी उपयोग करून निर्माण झालेल्या ‘सोशल साईट फॉर सोशल वर्किंग’ या ग्रुपने आज विजयी दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधीलकी जपली आहे. वैभवलक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांच्या साहाय्याने ३० हून अधिक दात्यांनी रक्तदान केले. या शिबिरासाठी श्रीप्रसाद पाटील, रेखा डावरे, निकिता पाटील, रुतुजा इनामदार, शुभम नरके, नेहा पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले.