कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे जागतिक पातळीवर ठप्प झालेली अर्थव्यवस्था उद्योगधंदे आर्थिक मंदीत असताना सुद्धा गोकुळची संकलन, प्रक्रिया व वितरण व्‍यवस्‍था सुयोग्य पद्धतीने सुरु आहे. दुग्‍धव्‍यवसाय विकासासाठी बल्‍क कुलर ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आरोग्‍य राज्‍यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर यांनी केले. आनंद एम सहकारी दूध संस्‍था मर्या., कवठेसार (ता. शिरोळ) येथे गोकुळच्या बल्‍क मिल्‍क कुलर युनिटचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी गोकुळचे चेअरमन विश्‍वास  पाटील (आबाजी) आणि संचालक उपस्थित होते.

या वेळी विश्‍वास पाटील म्‍हणाले की, उत्‍पादन वाढीबरोबरच गुणवत्‍तेत वाढ करावयाची झाल्‍यास बल्‍क कुलर योजना जिल्‍ह्यातील सर्व दूध संस्थांनी प्राधान्‍याने राबवावी. ज्‍यामुळे दूध उत्‍पादकांना अधिक लाभ होईल आणि ग्राहकांना देखील उत्‍तम गुणवत्‍तेचे दूध व दुग्धजन्‍य पदार्थ मिळू शकतील. गावातील सर्व दूध संस्थांनी मान, प्रतिष्‍ठा बाजूला ठेवून एकत्र येऊन गावात बल्‍क कुलर बसवून आधुनिक दुग्‍ध व्‍यवसायाचा मार्ग स्‍वीकारावा.

संचालक अजित नरके व सुजित मिणचेकर यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यकारी संचालक डी. व्‍ही. घाणेकर यांनी प्रास्ताविकात बल्‍क कुलर या आधुनिक संकल्‍पनेबाबत माहिती देऊन दूध संस्थांनी या व्‍यवसायात लक्ष केंद्रित करावे. असे सांगितले.

या वेळी संचालकांसह संघाचे अधिकारी, दूध संस्थांचे चेअरमन व सचिव उपस्थित होते.