कोल्हापूर (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यामध्ये सध्या दारू, मटका यासह अवैध धंद्यांचे पेव फुटले असून यावर पोलीस प्रशासनाने चाप लावावा अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष नितीन फाटक यांनी केली. याबाबत त्यांच्यासह शिष्टमंडळाने आज (बुधवार) पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भेट घेऊन त्यांना याबाबत सविस्तर माहिती दिली. लवकरच चंदगडला एक नवीन चांगला अधिकारी देऊन अवैध धंद्यांचा बीमोड करू, असे आश्वासन बलकवडे यांनी शिष्टमंडळाला दिले.

शिष्टमंडळाने बलकवडे यांना सांगितले की, चंदगड तालुक्याच्या सीमा कर्नाटक आणि गोवा राज्यांच्या सीमेशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गुटखा, दारू, मटका, जुगार असे अनेक अवैध धंदे चालतात. पूर्वी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख असताना जिल्ह्यातील अवैध धंद्यांना खीळ बसली होती. मात्र त्यांच्या बदलीनंतर काळे धंदे राजरोस सुरू आहेत. त्यातच चंदगड तालुक्याचे पोलीस निरीक्षक हे सध्या रजेवर असल्यामुळे या अवैध धंदे करणाऱ्यांना रान मोकळे झाले आहे. गोव्यातून तिलारीमार्गे येणारी दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. गुटखा, जुगाराला ऊत आला आहे, असे सांगत पदाधिकाऱ्यांनी बलकवडे यांचेसमोर काळ्या धंदेवाल्यांची यादीच नावासहीत सांगितली. चंदगड पोलीस अधिकारी आणि गुटखा, दारू, मटका, जुगार यांचे लागेबांधे कसे आहेत याबद्दल पुराव्यासहित सविस्तर माहिती दिली.

यावर पुढच्या काही दिवसात चंदगडला नवीन चांगला अधिकारी देऊ आणि दोषींवर कारवाई करू असे आश्वासन बलकवडे यांनी शिष्टमंडळाला दिले. या वेळी चंदगड तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष संदीप नांदवडेकर, जयंत देसाई (अडकूरकर), शशिकांत पाटील उपस्थित होते.