चंदगड (प्रतिनिधी) :  भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा रत्नप्रभा देसाई यांच्या नेतृत्वाखाली मायक्रो फायनान्स कंपनीच्या विरोधात तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. चंदगड तालुक्यातील शेकडो महिलांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला होता. यावेळी मायक्रो फायनान्सचे वारेमाप व्याज, दडपशाही, दादागिरी, रात्री अपरात्री वसुलीसाठी येणे, दमदाटी करणे, शिव्या देणे अशा अनेक व्यथा महिलांनी मांडल्या.

जोपर्यंत लेखी उत्तर देत नाही, तो पर्यंत आम्ही तहसीलदार कार्यालयासमोरून जाणार नाही अशी भूमिका महिलांनी घेतली. त्यानंतर तहसीलदार विनोद रणवरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करून मायक्रो फायनान्स कंपन्यांना पत्र पाठवले. तसेच पोलीस प्रशासनाला जर अशा जबरदस्तीने किवा दमदाटीने वसुली केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे पोलिसांना निर्देश देण्यात आले. तसेच कर्जवसूली थांबवण्याचे पत्र काढले.

या आंदोलनाला भाजपाचे प्रदेश सदस्य गोपाळराव पाटील, तालुकाध्यक्ष मल्लिकार्जून मुंगेरी, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप नांदवडेकर, उपाध्यक्ष नितीन फाटक, शशिकांत पाटील, जयंत देसाई, अनंत कांबळे, महादेव कांबळे, संगीता नेसरीकर, माधुरी सावंत, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.