भाजपच्या ‘त्या’ प्रयोगामुळे नितीशकुमारांना फटका

0
50

नाशिक (प्रतिनिधी) : बिहार विधानसभा निवडणुकीवरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा राहिलेला नाही, हे निवडणुकीच्या कलावरून दिसून येत आहे, असा टोला लगावतानाच ज्या पक्षाला सोबत घ्यायचे त्याच पक्षाला संपवायचे या भाजपच्या प्रयोगामुळेच मुख्यमंत्री नितीशकुमार यांना मोठा फटका बसल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले, प्रत्येक राज्यात एखाद्या पक्षाला सोबत घ्यायचे आणि त्याच पक्षाला नंतर संपवायचे हा भाजपचा नेहमीचा प्रयोग राहिला आहे. महाराष्ट्रात त्यांनी शिवसेनेची साथ घेतली. भाजपला महाराष्ट्रात कोणीही विचारत नव्हते. त्यांच्या एकदोन जागा यायच्या. आज परिस्थिती पाहतच आहोत. तोच प्रयोग त्यांनी बिहारमध्ये केला. त्याचाच फटका नितीशकुमार यांना बसला आहे.

बिहार निवडणुकीचे कल पाहिले तर भाजपची पहिल्यासारखी लाट राहिलेली दिसत नाही. समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीशकुमार, संपूर्ण भाजपा आणि त्यांचे मंत्री असतानाही तेजस्वी यादव यांनी कडवी टक्कर दिली. वडील तुरुंगात असूनही त्यांनी ज्या पद्धतीने पक्ष पुढे नेला त्यामुळे त्यांचे अभिनंदन केलंच पाहिजे. तेजस्वी यांचे सरकार येवो अगर न येवो पण त्यांचे अभिनंदन करायलाच हवं.