मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकाराच्या काळात एकमेकांसमोर ठाकणारे आमदार चंद्रकांत पाटील आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर आता गळ्यात गळा घालताना दिसत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील हे दोन मातब्बर नेते एकनाथ शिंदे सरकारमुळे एकत्र आले आहेत. त्यामुळेच क्षीरसागर यांची विधान परिषदेची आणि मंत्रीपदाचीही वाट मोकळी झाली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपद न स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याने कोल्हापुरातून मंत्रीपदासाठी क्षीरसागर यांनाच संधी असल्याची चर्चा मुंबईत आहे. त्यासाठी मात्र क्षीरसागर यांना भाजपला ‘शब्द’  द्यावा लागणार आहे. मुळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकांत पाटील भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत. तर राजेश क्षीरसागर कोल्हापुरातील शिवसेनेचे माजी आमदार आहेत. २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते सलग दोन वेळेस आमदार झाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष होते. एकनाथ शिंदेंबरोबर तेही बंडात सामील झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून क्षीरसागर यांना ओळखले जाते.

शिंदे सरकारच्या मंत्री मंडळात क्षीरसागर यांची वर्णी हमखास लागेल, असे सध्या वातावरण आहे. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू असल्याने त्यांना मंत्रीपदावर जाणे शक्य होईल. जरी शिंदे गटाकडून मंत्री मंडळात प्रवेश करता आला नाही, तरी भाजपच्या कोट्यातून त्यांना संधी दिली जाईल, असे वातावरण आहे.

चंद्रकांत पाटील आणि राजेश क्षीरसागर यांना कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळखतात. आणि दोघेजण एकाच सरकारमध्ये आहेत. त्यामुळेच क्षीरसागर यांना मंत्रीपदावर नेण्यात पाटील यांचा हातभार लागेल, अशी शक्यता आहे. याबरोबरच कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात एक तगडे आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेतृत्व भाजपला मिळेल. सध्याची भाजपची राजकीय खेळी पाहता कट्टर हिंदुत्ववादी आणि अग्रेसिव्ह मराठा नेतृत्व निर्माण करण्यात पुढाकार दिसतो. त्याचाच फायदा क्षीरसागर यांना होणार आहे.