भाजपचा बालेकिल्ला अभेद्य राहील : विजय पुराणिक

0
216

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कर्तृत्ववान संग्राम देशमुख यांना भाजपने उमेदवारी देऊन योग्य निवड केली आहे. कर्तृत्व सिद्ध केलेला तरूण उमेदवार दिल्याने पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला अभेद्य राहील, असा विश्वास भाजपचे संघटन मंत्री विजय पुराणिक यांनी व्यक्त केला. ते पेठ (ता.वाळवा) येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.

पुराणिक म्हणाले की, संग्राम देशमुख तरूण उमेदवार आहेत. त्यांना समाजातील प्रत्येक घटकांची जाणीव आहे. स्वकर्तृत्वाने त्यांनी साखर उद्योग आणि दूध संघ यशस्वी करून दाखविला आहे. अनेक पदवीधरांच्या हाताला काम देण्याचे त्यांनी मोठे कार्य केले आहे.

यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेऊन प्रचार करण्याचा सल्ला दिला. तसेच वाळवा, शिराळा तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या रणनितीचा आढावा घेतला. अध्यक्षस्थानी रवींद्र अनासपुरे होते. यावेळी मकरंद देशपांडे, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, स्वरूपराव पाटील, जयराज पाटील, नगरसेवक अमित ओसवाल, लक्ष्मण मदने, पार्थ शेटे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.