भाजपचे राज्यभरात २४ फेब्रवारीला जेलभरो आंदोलन

0
68

मुंबई (प्रतिनिधी) : महावितरणकडून शेतकरी व नागरिकांवर करण्यात येत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ २४ फेब्रवारीरोजी भाजपकडून राज्यभरात २८७ ठिकाणी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत झाले नसेल, इतके तीव्र आंदोलन केले जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महावितरणकडून दमदाटी करून, पोलिसांच्या बळाचा वापर करून शेतकऱ्यांची व घरगुती वीज तोडणे सुरू आहे. महाराष्ट्रात यापूर्वी कधीही मोगलशाही पद्धतीने कारभार केला गेला नाही, मात्र असे काम मागील आठ ते पंधरा दिवसांपासून वीज खात्याकडून सुरू झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. या मोगलशाही कारभारामुळे शेतकरी आत्महत्याकडे वळतील. राज्यातील ३ कोटी लोकांना अंधारात आणण्याचा सरकारकडून प्रयत्न होत आहे. या सरकारला आज आम्ही शेवटची विनंती करतो आहे,  असा इशाराही बावनकुळे यांनी यावेळी दिला.