कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यात विविध ठिकाणी महिलांवर अत्याचार, बलात्कार, विनयभंग, लूट अशा घटना घडत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या दुर्देवी घटनांची मालिका सुरुच आहे. महाविकास आघाडी सरकार राज्यातील महिलांचे रक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. याच्या निषेधार्थ आज (सोमवार) भाजपाच्या वतीने माळकर तिकटी याठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून निष्क्रिय सरकारचा निषेध नोंदवला.

यावेळी महिला मोर्चा अध्यक्षा गायत्री राऊत म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे. त्यातच कोरोना महामारी सारख्या गंभीर काळात देखील कोविड सेंटर आणि हॉस्पिटल्समध्ये महिलांवरील अत्याचार, विनयभंगाचे सत्र सुरुच आहे. कोविड काळात महिलांसाठी कोविड सेंटरमध्ये स्वतंत्र अलगीकरण कक्ष, सुरक्षा रक्षक, सी.सी.टीव्ही यांची व्यवस्था करण्यासाठी मुख्यमंत्री यांना पत्र, इमेल, विविध समाज माध्यमातून वारंवार निवेदने देऊन देखील याबाबत अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. आता तरी या सरकारने या घडलेल्या घटना गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर आरोपींवर कडक कारवाई करून महिला सुरुक्षतेसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली.

भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, जंबो कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभाव, डॉक्टरांची होणारी अवहेलना यासह सर्वच बाबतीत हे सरकार अपयशी ठरले आहे. महाविकास आघाडी सरकारने वीजदरवाढ माफ केली नाही. त्याबाबत जाब विचारल्यास महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याचे दिसते. महाराष्ट्रात महिलांवर होणारे अत्याचार थांबण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ठोस पाउल उचलले नाही तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.

माळकर तिकटी याठिकाणी भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्त्यांनी चारही बाजूंनी चौक अडवून महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.यानंतर पोलीसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

यावेळी सरचिणीस दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, उपाध्यक्ष मारुती भागोजी, संतोष भिवटे, संजय सावंत, राजू मोरे, अमोल पालोजी, विजय आगरवाल, सचिन तोडकर, भारती जोशी, जिल्हा चिटणीस प्रदीप उलपे, सुनीलसिंह चव्हाण, दिग्विजय कालेकर, भाजपा गटनेते अजित ठाणेकर, महानगरपालिका विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, भाग्यश्री शेटके, स्वाती कदम, सुषमा गर्दे आदी उपस्थित होते.