कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील नागरिकांना स्वच्छ  व मुबलक पाणीपुरवठा होत नाही. काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेची सद्य:स्थिती आणि ती पूर्ण कधी होणार याबाबत नागरिकांत संभ्रम असून महापालिकेने या विषयाची श्वेतपत्रिका लवकरात लवकर प्रसिद्ध करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांचेकडे केली.

शिष्टमंडळाने आज (बुधवार) डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन शहरातील पाणीपुरवठ्याच्या दुरवस्थेसंदर्भात विविध मुद्द्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. कोल्हापूरच्या पाणीपुरवठ्याची सद्य:स्थिती, पाण्याचा किती उपसा होतो आणि बिलिंग किती होते, सांडपाणी अधिभार जमा किती व त्या अधिभाराचा नेमका कोणत्या कोणत्या कारणा करीत व किती वापर झाला अशी मागणी केली.

कोल्हापूर शहरातील ड्रेनेज लाइन व पाणीपुरवठा पाईप लाइन बदलण्यासाठी केंद्र सरकारने अमृत योजनेंतर्गत १७० कोटींचा निधी मंजूर केला तरी उपस्थित केलेले प्रश्न प्रलंबित आहेत याचा विचार होणे गरजेचे आहे. २०१२ साली मंजूर झालेली काळंम्मावाडी थेट पाईप लाईनचे काम अतीशय धीम्या गतीने चालू असून ही योजना पूर्ण होणार की नाही याबाबत साशंकता आहे. जलव्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी बिलामध्ये ‘सांडपाणी अधिभार’ लावला परंतु यातून शहरवासीयांच्या खिशातून किती रुपये घेतले व किती ठिकाणी या सांडपाण्यावर प्रकिया करणारे प्रकल्प उभारले गेले याची कोणती माहिती आहे असा सवाल उपस्थित केला. काही अधिकारी, कर्मचारी व माजी लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने शहरात शेकडोंच्या संख्येने बिनमीटरची कनेक्शन असून ती प्रशासनाने तातडीने शोधावीत अशी मागणी केली.

त्यामुळे या सर्व उपरोक्त विषयांना अनुसरून महानगरपालिका प्रशासनाने पाणीपुरवठा या प्रश्नासंदर्भात तातडीने श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष चिकोडे यांनी केली.

या शिष्टमंडळात भाजपा सरचिटणीस हेमंत आराध्ये, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, भाजपा उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, सरचिटणीस दिलीप मेत्राणी, उपाध्यक्ष संजय सावंत, अमोल पालोजी, राजू मोरे, चिटणीस तौफिक बागवान यासह पदाधिकारी उपस्थित होते.