नागपूरमध्ये भाजपाचा पराभव हा फडणवीस, बावनकुळेंचा : राऊत

0
17

नागपूर (वृत्तसंस्था) : नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. नागपुरमधील भाजपाचा पराभव हा देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंचा असल्याचे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

विनायक राऊत हे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, नागपूर विधानपरिषेदची निवडणूक अतिशय महत्त्वाची मानली जाते. या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांच्यासारख्या नेत्यांचे राजकीय प्रस्थ असलेला हा मतदारसंघ आहे; परंतु या मतदारसंघात भाजप आणि शिंदे  गटाचा पराभव करून अडबाले यांचा विजय झाला आहे. त्यामुळे हा फडणवीस आणि बावनकुळेंचा पराभव आहे, असे राऊत म्हणाले.

सरकारपेक्षा महाविकास आघाडीवर जास्त प्रेम असल्याचे नागपूरमधील सर्व मतदारांनी दाखवून दिल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले हे प्रारंभापासून आघाडीवर होते. दुसरीकडे अपक्ष उमेदवार अजय भोयर यांनाही लक्षणीय मते मिळाली होती. दोन टर्म या मतदारसंघातून आमदार राहिलेले नागो गाणार, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले या तिघांत थेट लढत राहिल असे चित्र होते. प्रत्यक्षात अडबाले आणि गाणार यांच्यातच लढत असल्याचे दिसून आले. अजय भोयर यांच्यामुळे नागो गाणार यांना मिळणाऱ्या मतांमध्ये विभाजन झाल्याचे सांगितले जात आहे.