मुंबई  (प्रतिनिधी) : राज्यातील ठाकरे सरकारने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक   नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून भाजपच्या नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार  यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन  करून आपली सुरक्षा कमी कऱण्यास सांगितले आहे.  

शरद पवार यांनी  गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करून माझी सुरक्षा कमी करा, मी स्वत: सुरक्षा कमी करण्यास तयार आहे. मला देण्यात आलेल्या सुरक्षेचा आढावा घ्या आणि त्यानंतर निर्णय घ्या,  असे त्यांनी गृहमंत्र्यांना सांगितल्याचे समजते. दरम्यान, ज्यांच्याकडे महाराष्ट्र सैनिकांची एवढी सुरक्षा असताना राज ठाकरे यांची झेड सुरक्षा काढून काय तीर मारणार अशी टीका मनसेने केली आहे. तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात म्हणजे कोत्या मनोवृत्तीचे सुडाचे राजकारण असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्टिट करून केला आहे.