बंडखोरी मागे भाजपचे कारस्थान : उद्धव ठाकरे

0
64

मुंबई (प्रतिनिधी) : मला सत्तेचा लोभ नाही आणि कशाचाच मोह नाही. वर्षा सोडून मातोश्रीवर आलोय, पण जिद्द कायम आहे आणि आत्ताही मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. ठाकरे, शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा, असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांना दिले. जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत त्यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. त्यांनी बंडखोरी मागे भाजपचे कारस्थान असल्याचा आरोपही केला आहे.

जे सोडून गेले त्यांचे वाईट का वाटावे, मी जिद्द सोडली नाही, असा इशारा देऊन ठाकरे म्हणाले, काही जण म्हणत होते, मेलो तरी शिवसेना सोडणार नाही. आज तेच पळून गेले. आपल्या सगळ्यांना पुन्हा जिद्दीने पक्ष उभा करण्याचे आवाहन आहे.

बाहेरच्या भाडोत्री लोकांकडून आपल्यात वाद निर्माण करायचा प्रयत्न झाला. आपलीच काही लोक घेऊन सेनेवर सोडण्यात आली. सेनेच्या अस्तित्वावर बोलणाऱ्यांना निष्ठा काय असते दाखवावी लागेल. मला वीट आलाय, म्हणजे मी वीट हाणणारच. यांना ठेऊन काय करु, हे सारे भाजपने केले. त्यांची आग्र्याहून सुटका करावीच लागेल, तुम्हाला जर भविष्य दिसत असेल तर खुशाल जा, मी लायक नसेन तर पद सोडायला तयार आहे. मुख्यमंत्रिपद माझ्यासाठी गौण, बाळासाहेबांसाठी माझ्याहून लाडके अपत्य म्हणजे शिवसेना होय, असेही ते म्हणाले.

एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केले, नगरविकास खाते दिले. माझ्याकडची दोन खाती शिंदेंना दिली. संजय राठोडांवर वाईट आरोप होऊनही मी सांभाळले. विठ्ठल-बडव्यांवर जे बोलत आहेत, त्यांचा पोरगा खासदार आहे, असे सांगून ठाकरे म्हणाले, माझे मुख्यमंत्रिपद मान्य नसणे ही राक्षसी महत्त्वाकांक्षा, झाडावरची फुले न्या, फांद्या न्या, मूळ मात्र नेऊ शकत नाही. आमदारांना फूस लावून मी सत्तानाट्य का घडवेन, असाही सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.